नागपूर : "केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी आज मांडलेल्या अर्थसंकल्प समतोल साधणारा आहे. अर्थमंत्र्यांनी केलेल्या घोषणा फार आवश्यक आहेत. हा बजेट अजिबातच पॉपुलर बजेट नव्हते. केवळ घोषणा करूनच चालणार नाही. तर त्या घोषणा अंमलात आल्या तर बजेट अतिशय चांगले होऊ शकते", अशी प्रतिक्रिया, चार्टर्ड अकाउंटेंट तेजिंदरसिंग रवाल यांनी दिली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टेरिफ धोरणाचा भारताला फटका बसलेला आहे. 70 टक्के निर्यात व्यवसाय जवळजवळ शून्यावर आलेला आहे. अमेरिका हा भारताचा सर्वात मोठा ग्राहक होता. 70 टक्के निर्यात अमेरिकेत व्हायची. डिफेन्स आणि फार्मासिटिकल उद्योग वगळता इतर एक्सपोर्ट व्यवसाय ठप्प झालेले आहेत. स्पोर्ट गुड्स, टेक्स्टाईल प्रभावित झालेला आहे. यावर तोडगा शोधण्याचा प्रयत्न निर्मला सीतारामण यांनी केल्याचं निरीक्षण अर्थतज्ञांनी नोंदवलं आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात टेक्स्टाईल सोबत टुरिझमवरही भर दिलाय. जागतिक दर्जाची कॅट कॉन्फरन्स आयोजित करण्याची घोषणा त्यांनी केली. त्यामुळंच विदर्भात असलेल्या व्याघ्र प्रकल्पांना जागतिक स्तरावरती आणखी नवीन ओळख मिळेल. त्यातून पर्यंटनासह नव्या रोजगाराची निर्मिती होईल, असं मत अर्थतज्ञांनी व्यक्त केलंय.