रायगड : तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळं राज्यभर शोककळा पसरली आहे. अनेक ठिकाणी पक्षाचा प्रचार तात्पुरता थांबवण्यात आला आहे. मात्र, उमेदवारांचा विजय हीच अजितदादांना खरी श्रद्धांजली या भावनेतून मंत्री आदिती तटकरे यांच्या म्हसळा मतदारसंघात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते प्रचार करताना दिसत आहेत. म्हसळा तालुक्यातील मेंदडी गावात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी कोणताही दिखाऊपणा न करता प्रचाराची सूत्रे हातात घेतली आहेत. कार्यकर्त्यांनी पक्षाच्या विचारांना आणि विकासाच्या कामांना न्याय देण्यासाठी घरोघरी भेटी देत मतदारांशी संवाद साधला. शक्तिप्रदर्शन टाळत साधेपणानं आणि जड अंतःकरणानं प्रचार सुरू असल्याचं चित्र येथे पाहायला मिळालं. कार्यकर्त्यांच्या मते, अजितदादांनी आयुष्यभर सामान्य माणसासाठी काम केलं. त्यामुळं त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आक्रमक प्रचार न करता लोकांपर्यंत जाऊन त्यांच्या अपेक्षा जाणून घेणे आणि विकासाचा मुद्दा मांडणे, हेच अधिक योग्य ठरेल. उमेदवारांना विजयी करून अजितदादांचे अपूर्ण स्वप्न पूर्ण करणे हीच आमची खरी श्रद्धांजली, अशी भावना अनेक कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.