बीड : बीडच्या गेवराई तालुक्यातील राक्षसभुवन येथील बहुचर्चित वाळू घोटाळ्यात आता कारवाईचा फास अधिक घट्ट होताना दिसत आहे. घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांच्या नावाचा गैरवापर करून गोदावरी नदीपात्रातून झालेल्या अवैध वाळू उपसा प्रकरणाची जिल्हाधिकारी कार्यालयात पाच तास तहसीलदारांसह अन्य अधिकाऱ्यांची सुनावणी पूर्ण होताच प्रशासन ॲक्शन मोडमध्ये आलं आहे. तलाठी, कंत्राटी कर्मचारी आणि तब्बल 15 दलालांवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे प्रत्यक्ष सर्वेक्षणात 250 लाभार्थ्यांनी आम्हाला कोणतीही वाळू मिळाली नसल्याचा जबाब दिला आहे. कागदोपत्री नोंदी आणि प्रत्यक्ष वास्तवातील तफावत उघड झाल्यानं खळबळ उडाली आहे. दरम्यान, तहसीलदार संदीप खोमणे यांच्यावरही गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. तसंच त्यांच्या निलंबनाचा प्रस्तावही वरिष्ठांकडं पाठवला असल्याचा दावा जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी केला आहे.