पुणे : विनायक चतुर्थीनिमित्त श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर येथे स्वराभिषेकाचे आयोजन करण्यात आले होते. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळ यांच्या वतीने शेषनागाच्या विविधरंगी फुलांच्या प्रतिकृती साकारून आकर्षक सजावट करण्यात आली. याच दिवशी भगवान गणेशांचा पाताळातील शेषात्मज अवतार प्रकट झाल्याची धार्मिक मान्यता आहे. गणेश जयंतीनिमित्त गुरुवारी पहाटे 3 वाजता ब्रह्मवृंदांच्या उपस्थितीत बृहस्पती सूक्त अभिषेक पार पडला. त्यानंतर पहाटे 4 वाजता विदुषी शैला दातार यांनी स्वराभिषेकाद्वारे गणरायाच्या चरणी स्वरसेवा अर्पण केली. तसेच मंदिरात अभिषेक आणि गणेश यागाचेही आयोजन करण्यात आले. शेषनागाच्या प्रतिकृतींनी सजविलेल्या मंदिरात आणि गाभाऱ्यात विविधरंगी फुलांपासून साकारलेल्या शेषनागाच्या कलाकृतीमध्ये विराजमान असलेल्या लाडक्या गणरायाच्या चांदीच्या मूर्तीचे विलोभनीय रूप पाहण्यासाठी भाविकांनी सकाळपासून मोठी गर्दी केली.