पुणे : राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा पक्षफुटीच्या चर्चांना उधाण आलं आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे काही खासदार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चेनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षातील खासदारांबाबतही विविध चर्चा आणि तर्कवितर्क सुरू झाले आहेत.
याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते अंकुश काकडे यांनी या चर्चांना फेटाळून लावत अफवा असल्याचं म्हटलं आहे. ते म्हणाले, "आमचे आठही खासदार संसदेत सक्रियपणे काम करत आहेत आणि सर्वांची शरद पवार यांच्यावर अढळ श्रद्धा आहे. पक्षात कोणतीही नाराजी नाही आणि कोणताही खासदार पक्ष सोडण्याच्या तयारीत नाही." काकडेंनी दावा करणाऱ्यांवरही टीका करताना, "अशा प्रकारचे दावे करणाऱ्यांचे पक्षातील स्थान काय आहे, हे पाहणं महत्त्वाचे आहे. कुणी काही बोललं म्हणून त्याला महत्त्व देण्याचे कारण नाही," असं म्हटलं. तसेच, "कोणत्याही कामानिमित्त नेते किंवा लोकप्रतिनिधी एकमेकांना भेटत असतात. अशा भेटींमधून पक्षांतराचे निष्कर्ष काढणं योग्य नाही. पवार साहेबांना त्यांच्या आठही खासदारांबाबत कोणतीही अस्वस्थता नाही," असंही त्यांनी स्पष्ट केलं.
यावेळी त्यांनी धर्मराव बाबा आत्राम यांनाही टोला लगावत, "तुम्ही तुमच्या आमदारांची काळजी घ्या," असा टोला लगावला. पक्षफुटीच्या चर्चांवर प्रतिक्रिया देताना काकडे म्हणाले, "कोण काय चर्चा करतो, त्यावर आपलं नियंत्रण नसतं. मात्र एक गोष्ट निश्चित आहे, पवार साहेबांच्या राष्ट्रवादीचं ऑपरेशन करण्यासाठी अजूनपर्यंत देशात कोणताही सर्जन तयार झालेला नाही."