पुणे : काही महिन्यांपूर्वी उघडकीस आलेल्या नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणामुळे देशभरात खळबळ उडाली होती. या प्रकरणाचा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाकडून (CBI) सुरू असून पुणे, नाशिक, बीडसह विविध ठिकाणांहून अनेक आरोपींना अटक करण्यात आली आहे.
दरम्यान, आज देशभरातील सुमारे 5 हजार परीक्षा केंद्रांवर नीट परीक्षा पार पडत आहे. पुण्यात २७ केंद्रांवर ही परीक्षा होत असून सकाळी 11 वाजल्यापासून विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रांवर हजेरी लावण्यास सुरुवात केली. पुण्यातील स. प. महाविद्यालय येथील परीक्षा केंद्रावरही विद्यार्थी आणि पालकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. परीक्षा केंद्रात प्रवेश करण्यापूर्वी विद्यार्थ्यांच्या हॉलतिकीट, ओळखपत्र आणि आधार कार्डची काटेकोर तपासणी करण्यात आली. सुरक्षा नियमांचे पालन करत विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात प्रवेश देण्यात आला. यावेळी विद्यार्थी आणि पालकांशी संवाद साधला असता, गेल्या वर्षीच्या पेपरफुटी प्रकरणामुळे मानसिक तणावाला सामोरं जावं लागल्याचं त्यांनी सांगितलं. यंदाची परीक्षा कोणत्याही गैरप्रकाराविना आणि पारदर्शकपणे पार पडावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.