पुणे : जून महिन्याचे 20 दिवस उलटल्यानंतरही पुणेकरांना उष्णतेचा तीव्र सामना करावा लागत होता. राज्यातील काही भागांत मान्सून दाखल झाला असला तरी पुण्यात अद्याप मान्सूनचं आगमन झालेलं नाही. मात्र, आज रविवारी (21 जून) दुपारच्या सुमारास शहरात झालेल्या पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला.
अचानक आलेल्या पावसामुळे वाहनचालकांची चांगलीच तारांबळ उडाल्याचं चित्र पाहायला मिळालं. गेल्या आठवडाभरापासून पुण्यात तापमानात सातत्यानं वाढ होत होती. कमाल तापमान 37 ते 40 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचल्यानं नागरिक उकाड्याने त्रस्त झाले होते. दरम्यान, आज झालेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून पुणेकरांना उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळाला आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, पुण्यात अद्याप मान्सून दाखल झालेला नसून पुढील 24 ते 48 तासांत मान्सून शहरांत दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.