पुणे : राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे असलेले अर्थखाते परत घेण्यावरून जोरदार चर्चा सुरू झाली आहे. महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते दिवंगत अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर अर्थखाते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्याजवळ ठेवले होते. आता या खात्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते जय पवार यांनी मोठं वक्तव्य करत लवकरच राज्याचे अर्थखाते राष्ट्रवादीला मिळेल असं म्हटलं आहे. बारामतीमध्ये आज दिवंगत अजित पवार यांच्या सहवासातील आजी-माजी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांसाठी 'कृतज्ञता स्नेहमेळाव्याचं' आयोजन करण्यात आलं होतं0. या कार्यक्रमात उपस्थितांशी संवाद साधताना जय पवार बोलत होते. यावेळी जय पवार म्हणाले की, "अनेकजण बोलतात की आपले अर्थखाते अजून आपल्याकडे आलेले नाही, त्यामुळं काही ठिकाणी आपली विकासकामे थांबली आहेत. पण वस्तुस्थिती तशी नाही. ज्यावेळी दादा आपल्याला अचानक सोडून गेले, त्यावेळेस राज्याचा अर्थसंकल्प अतिशय जवळ आला होता. त्यामुळं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्या क्षणाला ते अर्थ खाते स्वतःकडे ठेवण्याचा निर्णय घेतला, जेणेकरून अर्थसंकल्पाचे काम सुरळीत पार पडेल," असं यावेळी जय पवार म्हणाले.