जालना : जालना शहरात बुधवारी राजकीय वातावरण तापल्याचं दिसून आलं आहे. भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसचे खासदार डॉ. कल्याण काळे यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर जोरदार आंदोलन केलं. या आंदोलनादरम्यान भाजपा आणि काँग्रेसचे कार्यकर्ते समोरासमोर आल्यानं काही काळ परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं. दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळं परिसरात मोठी गर्दी झाली होती. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांनीही खबरदारी घेतली. भाजपाच्या आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी राहुल गांधी यांच्या फुल्या मारलेल्या प्रतिमा हातात घेत काँग्रेसविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. 'जय श्रीराम'च्या घोषणांनी परिसर दणाणून गेला. दिल्लीतील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर काँग्रेसनं काल केलेल्या आंदोलनाचा निषेध करण्यासाठी हे आंदोलन केल्याचं भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं. यावेळी भाजपा पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसवर केंद्र सरकारविरोधात अनावश्यक वातावरण निर्माण करण्याचा आरोप केला. दिल्लीतील आंदोलनामागं राजकीय हेतू असल्याचा दावा केलाय. अशा आंदोलनांमुळं लोकशाहीपेक्षा राजकारणालाच अधिक प्राधान्य दिलं जात असल्याची टीका करण्यात आली.