रत्नागिरी : काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेल्या एका ट्विटवरून राजकीय वातावरण तापलं आहे. त्या ट्विटवरून भाजपा आमदार अभिमन्यू पवार यांनी सपकाळ यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. "माझा या प्रकरणाशी कोणताही संबंध नसताना हर्षवर्धन सपकाळ यांनी माझं नाव गोवून माझी बदनामी करण्याचा आणि 'कॅरेक्टर असासिनेशन' करण्याचा प्रयत्न केला आहे. याविरोधात मी औसा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पुढील दोन दिवसांत माझे वकील त्यांना कायदेशीर नोटीस पाठवतील," असा थेट इशारा आमदार पवार यांनी दिलाय. परीक्षा प्रक्रियेवर भाष्य करताना पवार म्हणाले, "राज्य सरकारच्या माध्यमातून सर्व परीक्षा अत्यंत पारदर्शक पद्धतीनं पार पडत आहेत. केंद्रामध्ये जसा भ्रष्टाचाराचा माहोल तयार करण्याचा प्रयत्न झाला. तसाच प्रयत्न महाराष्ट्रात घडवून आणण्याचा बालिश प्रयत्न सपकाळ करत आहेत. प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून केवळ टार्गेट करणं एवढंच त्यांचं काम सुरू आहे. कोणीही विचारत नसल्यामुळं प्रसिद्धी मिळवण्यासाठी थेट मुख्यमंत्र्यांवर टीका करायची आणि उठलं-सुटलं कोणावरही आरोप करायचं. असा प्रकार सुरू आहे."