पुणे : शिवसेना पक्ष आणि 'धनुष्यबाण' चिन्हाच्या वादावर आज पुन्हा सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. याबाबत कायदेतज्ज्ञ असीम सरोदे यांनी महत्त्वाची माहिती दिली. सरोदे म्हणाले, "आज कोर्टात महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष आणि आमदारांच्या अपात्रतेसंदर्भातील घडामोडींवर मुख्य चर्चा होईल. तत्कालीन विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी घेतलेले काही निर्णय आज चर्चेला येतील आणि त्यावर सुनावणी होईल. मुळात, अपात्र लोकांनीच हे सरकार चालवलंय. सन 2013 ते 2022 या काळात शिवसेना राजकीय पक्ष म्हणून उद्धव ठाकरे यांची पक्षप्रमुखपदी कायदेशीर मतदानातून निवड झाली होती आणि तेव्हापासून तेच अध्यक्ष आहेत. 23 जानेवारी 2013 रोजी झालेली त्यांची निवड ही लोकशाही मार्गानं झाली होती. 2014 ते 2022 या काळात शिवसेना सरकारमध्ये असताना उद्धव ठाकरे यांचे अधिकार मान्य नाहीत, असं कधीच घडलं नाही. उद्धव ठाकरे हेच पक्षप्रमुख असून एकनाथ शिंदे यांनी त्यांच्यासोबत काम केलंय. विशेष म्हणजे, 2019 ते 2022 या महाविकास आघाडी सरकारच्या काळात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर कधीही आक्षेप घेण्यात आला नव्हता, केवळ नंतर राजकीय आरोप करण्यात आले.''