पंढरपूर - येत्या 25 जुलै रोजी आषाढी एकादशीचा मुख्य सोहळा होणार असून यासाठीची जय्यत तयारी प्रशासनाच्या वतीने करण्यात आली आहे. आज सोलापूर जिल्ह्यामध्ये मानाच्या पालख्याचे आगमन होणार असून पंढरपूरमध्ये हरिनामाच्या जयघोषात भक्तिमय वातावरण तयार झालंय. विठ्ठलाचं चरण दर्शन घेण्यासाठी दर्शन रांगेमध्ये कालपासून मोठी रांग लागल्याचं चित्र दिसत असून ही दर्शनरांग पत्रा शेडच्या पुढे गेली आहे. जिल्हाधिकारी एस कार्तिकी आणि यांच्या आदेशानुसार पंढरपूरमध्ये विठ्ठलासाठी व्हीआयपी दर्शन पूर्णपणे बंद केल्यामुळे भाविकांना जलद चरण दर्शन होत आहे. दर्शनासाठी सात ते आठ तासाचा कालावधी लागत आहे. प्रशासनाने यावर्षी स्वच्छतेवरती मोठ्या प्रमाणावरती भर दिल्याने नदीपात्र, वाळवंट परिसर या ठिकाणी स्वच्छता दिसून येत असल्याने भाविकांमधून समाधान व्यक्त होत आहे. दर्शन रांगेतील भाविकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये तसेच एकही भाविक उपाशी राहू नये, यासाठी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीनं दर्शन रांगेत मोफत चहा, शुद्ध थंड पिण्याचे पाणी, खिचडीचे वाटप करण्यात येत असल्याची माहिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली.